भारत निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील एकूण 9.63 कोटी मतदारांसाठी हा निवडणूक उत्सव असणार आहे. यामध्ये 4.98 कोटी पुरुष मतदार आणि 4.66 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी केलेल्या तयारीत राजीव कुमार यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 85 वर्षांवरील मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे, तसेच त्यांची गोपनीयता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारांना मतदानाच्या वेळी आरामदायी अनुभव देण्यासाठी मतदान केंद्रावर रांग असलेल्या ठिकाणी खुर्ची किंवा बाकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी पारदर्शकतेवर भर देत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांची पार्श्वभूमी तीन वेळा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्यात सर्व मतदारांचा सहभाग आवश्यक असल्याचेही कुमार यांनी नमूद केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठीची महत्त्वाची तारीख 22 ऑक्टोबरला गॅझेट नोटिफिकेशन जाहीर होणार आहे, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे, तर अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला होणार आहे आणि 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.
Comentarios